राष्ट्रवादी पक्षाचे ठाण्याचे तरुण आमदार श्री. जितेंद्र आव्हाड यांचे करावे तितके कौतुक कमीच पडेल. परवा आपला एक राष्ट्रीय सण येत आहे. काही लोकांचा याला राष्ट्रीय सण म्हणण्यास विरोध आहे, कारण ते बुरसटलेल्या विचारांचे लोक सणाचे महत्व जाणतच नाहीत. तर या राष्ट्रीय सणाला होणारा विरोध झुगारुन श्री. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातच राममारुती रोडला फक्त "व्हॅलेंटाईन डे" साजरा करता यावा म्हणुन एक दुकान थाटल्याचे वर्तमान पत्रात कळले व आनंद व समाधानाने ऊर भरुन आला. म्हणुन हे अभिनंदन !
समस्त तरुण वर्गाच्या भावना समजून घेतल्या बद्दल परत एकदा आभार.
ठाण्यातच नाही तर सर्वत्रच, तरुणांच्या पाठीशी रहाणार्या अशा नेत्यांची महाराष्ट्राला नाही तर देशाला गरज आहे.
तरुण वर्गाची होणारी कुचंबणा लक्षात घेवून श्री. आव्हाड यांनी यापुढे तरुणांसाठी खालील सोयी कराव्यात ही विनंती.
१. तरुण वर्गाला आपल्या भावना जोडीदाराला जवळून निट सांगता याव्यात यासाठी "तारांगणाच्या" धर्तीवर "प्रेमांगण" निर्माण करावे. तेथे तरुण वर्ग आपल्या भावना चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकेल व कोणाचाही तेथे अडथळा होणार नाही.
२. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी आपल्या प्रेमळ भावना व्यक्त करायला परवानगी द्यावी यासाठी प्रयत्न करावे.
३. श्री. आव्हाड यांचा पक्ष सत्तेवर असे पर्यंत त्यांनी कोणत्याही रस्त्यावर व सार्वजनीक ठिकाणी प्रेमळ भावना व्यक्त करतांना दिसल्यास पोलीसांचा त्रास होणार नाही असा आदेश काढावा.
४. प्रत्येक शहरात मुख्य रस्त्यांच्या बाजूला अशी "प्रेमळ ठिकाणे" निर्माण करावी.
५. तरुणींची हल्ली वाहत जाणारी तरुणाई व त्यांचे पोशाख काही बुरसटलेल्या वर्गाला खटकतात. अशा बुरसटलेल्या लोकांवर खटले भरुन त्यांना चांगला धडा शिकवावा. तसेच या तरुणींना अधिक मोकळी हवा मिळेल असे कपडे घालण्यास मिळावेत यासाठी आपण अशा वस्त्रांची निर्मीती करुन विकण्याची व्यवस्था करावी.
अधिक काही सुचल्यास वा कोणी सुचवल्यास यात भर घालेन याचे आश्वासन देतॊ.
परत भेटूच.